तीन आठवड्यांत 500 कोटींचा टप्पा पार
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सायारा’ या रोमँटिक म्युझिकल चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले असून, केवळ १८ दिवसांत जगभरात तब्बल ₹507 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या आहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्म्सने आपल्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करत लिहिले, “#सायारा तुमच्या हृदयात घर करत गेली – यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत.”
तरुण प्रेक्षकांनी दिला भरघोस प्रतिसाद
यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, “आजच्या तरुण प्रेक्षकांनी ‘सायारा’ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. थिएटरकडे त्यांचा ओढा कमी होत आहे, हे म्हणणे या चित्रपटाने चुकीचे ठरवले. सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार – ‘सायारा’ ही आजच्या काळातील एक परिभाषित प्रेमकहाणी ठरली आहे.”
तिसऱ्या आठवड्यात गती मंदावली, तरीही हिट
१८ जुलैला प्रदर्शित झालेला ‘सायारा’ सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळवत होता. दोन आठवड्यांपर्यंत चित्रपटाची घोडदौड कायम राहिली, पण तिसऱ्या आठवड्यात काहीशी गती मंदावली. याचे मुख्य कारण म्हणजे ‘महावतार नरसिंह’ या अॅनिमेशन चित्रपटाची जोरदार एंट्री. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यामुळे ‘महावतार नरसिंह’ने मोठा उधळा केला आहे.
१ ऑगस्टला ‘सोन ऑफ सरदार २’ आणि ‘धडक २’ हे दोन नवीन चित्रपट प्रदर्शित झाले, पण तरीही ‘महावतार नरसिंह’ने या दोघांनाही मागे टाकले आणि ‘सायारा’चाही काहीसा प्रभाव कमी झाला.
सायाराची एकूण कमाई 304 कोटींच्या घरात
सायाराने सोमवारपर्यंत एकूण ₹304.28 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ₹14 ते ₹15 कोटींच्या घरात कमाई केली, तर सोमवारी ₹2.5 कोटी आणि मंगळवारी, म्हणजे प्रदर्शनाच्या १९व्या दिवशी, ₹2.18 कोटींची कमाई झाली आहे.
‘महावतार नरसिंह’चा वेग वाढतोय
दरम्यान, ‘महावतार नरसिंह’ने सोमवारी ₹7.35 कोटींची कमाई केली, तर मंगळवारी दुपारपर्यंत ₹2.64 कोटी कमावले आहेत. त्यामुळे आता एकूण कमाई ₹100.94 कोटींपर्यंत पोहोचली असून, मंगळवारच्या अखेरीस तो ₹100 कोटींचा टप्पा पार करेल हे निश्चित मानले जात आहे.
नवीन चित्रपटांची घसरण
‘धडक २’ आणि ‘सोन ऑफ सरदार २’ हे नवीन चित्रपट मात्र प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात अपयशी ठरत आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि त्रिप्ती डिमरीच्या ‘धडक २’ने पाचव्या दिवशीपर्यंत केवळ ₹13.2 कोटींची कमाई केली आहे, तर अजय देवगणच्या ‘सोन ऑफ सरदार २’ने आतापर्यंत ₹27.63 कोटींची कमाई केल्याचे सॅकनिल्कच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.