दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे आणि फराळामध्ये चविष्ट, कुरकुरीत चकलीचा समावेश असतोच. जरी हवामान थोडं दमट असलं तरी चकलीशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. तुम्हीही घरी सहज आणि हमखास यशस्वी होणारी चकली बनवू इच्छित असाल, तर ही रेसिपी अवश्य वापरा. सुरुवात करूया चकलीसाठी लागणाऱ्या भाजणीपासून.
चकलीसाठी भाजणी कशी तयार करावी?
भाजणी ही चकलीची चव आणि कुरकुरीपणासाठी अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी लागणारे धान्य स्वच्छ धुवून सावलीत पूर्ण वाळवावे.
साहित्य:
-
3 वाट्या साधा तांदूळ
-
दीड वाटी हरभऱ्याची डाळ
-
1 वाटी उडीद डाळ
-
अर्धी वाटी मूग डाळ
-
1 वाटी पातळ पोहे
-
पाऊण वाटी धणे
-
2 टेबलस्पून जिरे
कृती:
-
प्रथम तांदूळ मंद आचेवर भाजा. ते फार लालसर होण्याआधी थोडासा गुलाबी रंग आला की गॅस बंद करा.
-
त्याचप्रमाणे हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ भाजा. दोन्ही डाळींना थोडा लालसर छटा आल्यावर गॅस बंद करा.
-
मग मूग डाळ भाजा.
-
त्यानंतर पोहे भाजा. पोहे भाजताना अर्धवट भाजले गेले असताना त्यात धणे घालून दोन्ही एकत्रित भाजा.
-
हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर त्यात जिरे टाका आणि बारीक दळून घ्या.
ही भाजणी तुम्हाला अंदाजे 40–50 मध्यम आकाराच्या चकल्या बनवण्यासाठी पुरेल.
चकली बनवण्याची कृती (2 वाट्या भाजणीसाठी):
साहित्य:
-
2 वाट्या चकलीची भाजणी
-
पाऊण वाटी गरम पाणी
-
अर्धा टेबलस्पून लाल तिखट
-
चवीनुसार मीठ
-
अर्धा टेबलस्पून ओवा
-
1 टेबलस्पून तीळ
-
पाव टीस्पून हिंग
-
2 टीस्पून तूप
कृती:
-
एका पातेल्यात वरील सर्व मसाले गरम पाण्यात टाका आणि ते उकळा.
-
पाणी उकळल्यावर त्यात भाजणी टाका आणि झाकण ठेवून गॅस बंद करा.
-
हे पीठ एकजीव करून थोडं थंड होऊ द्या आणि नंतर झाकून 1 तास बाजूला ठेवा.
-
तासानंतर पीठ थोडंसं पाण्याने मऊसर भिजवा.
-
चकली साच्याला आतून तेल लावून, तयार पीठ त्यात भरून घ्या.
-
बटर पेपर किंवा पाटीवर मध्यम आकाराच्या चकल्या बनवा.
-
कढईत तेल गरम करा. तेल चांगलं तापल्यावर गॅस मध्यम करा आणि चकल्या तळा.
दोन वाट्यांपासून तुम्हाला अंदाजे 15–16 कुरकुरीत, खमंग चकल्या मिळतील.